महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात महालक्ष्मी (अंबाबाई) Mahalaxmi Mandir मंदिर आहे. महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो. कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक दृष्ट्या, संस्कृत दृष्ट्या व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व आहे.
कोल्हापूर मधील महालक्ष्मीचे मंदिर Mahalaxmi Mandir महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पिठांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
श्री महालक्ष्मीची मूर्ती रत्नजडित खड्यांपासून घडवण्यात आली असून ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षांपूर्वीची असावी असे बोलले जाते. या देवीची मूर्ती किमतीच्या दगडाची असून वजनाला 40 किलो ग्रॅमची आहे. मूर्ती घडवताना हिरक नावाचा धातू मिसळला आहे. हे मंदिर चौकोनी दगडाच्या तुकड्यावर उभारले गेले आहे. या मूर्तीला चार हात असून एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल आहे. उजव्या हातात खालील बाजूस महाळुंग म्हणजे फळांचा एक प्रकार आणि डाव्या हातात पानाचे ताट आहे. डोक्यावर मुकुट असून त्यावर शेषनागाची मूर्ती आहे. या मंदिराच्या कोरीव कामांमध्ये वेगवेगळे वेदमंत्र कोरले आहेत. या मंदिराचे तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असते देवीची मूर्ती पश्चिम मुखी आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर छोटीशी खिडकी आहे. या मंदिरात साखर मिश्रित दुधाचा नैवेद्य करून शेष आरती केली जाते. रात्री देवीच्या गाभाऱ्यात आरती केली जाते. त्यानंतर मुख्य दार आणि इतर बंद करतात. एकूण दिवसातून पाच वेळा आरती करतात. दररोज पहाटे साडेचार वाजता काकड आरती केली जाते. मंगल आरती नंतर सकाळी आठच्या सुमारास महापूजा करण्यात येते. रोज रात्री दहाच्या सुमारास शेष आरती होते.
दरवर्षी वर्षातून एकदा साजरा होणारा किरणोत्सव हा सोहळा या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी मार्च आणि नोव्हेंबर मध्ये हा सोहळा साजरा केला जातो. ठराविक दिवशी उगवत्या सूर्याची किरणे लक्ष्मीच्या महालक्ष्मीवर पडतात. हा सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी हजारो भाविक कोल्हापूरमध्ये येत असतात. याशिवाय रथोत्सव, अष्टमी, जागर, ग्रहण, गोकुळाष्टमीला विशेष आरती केली जाते.
महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी जनतेची गर्दी असते. शुक्रवार व मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व अश्विन, कार्तिक, मार्गशीष व माघ या चारही पौर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखी प्रदक्षिणा काढली जाते. पालखी बरोबर देवीचे भालदार चोपदार व पालखीचे भोई असतात. नवरात्रात नऊ दिवस देवीची पूजा करतात.
देवळाच्या वेगवेगळ्या भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्वराच्या देवळाच्या भिंतीवर शके 1940 मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूच्या असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८ चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोट्या देवळातील एका खांबावर आहे आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशाई मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो.
महालक्ष्मीच्या देवळाच्या परिसरात असलेल्या देवळांपैकी शेषशायी व नवग्रहांचे देऊळ शिल्प आणि प्राचीनत्व या दृष्टीने महत्त्वाची आहेत. शेषशायी देऊळ पूर्व दरवाजाच्या दक्षिणेला आहे. नवग्रहांच्या देवळालाही दर्शनी बाजूला एक सुंदर मंडप असून त्या मंडपाच्या छताला आतील बाजूवर असलेल्या नऊ तावदानावरून या मंडपाला नवग्रह मंडप म्हणतात. हा मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पाचा एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे. मंडपाच्या वरच्या बाजूला हंसाच्या प्रतिकृती व टोकाला अप्सरांच्या अतिशय सुंदर मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत.
देवळाच्या भिंतीवर नर्तकी ,वाद्ये वाजवणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, विणावादी, आरसादेखी ,यक्ष, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताची किरणे बरोबर देवीच्या मुकाव्र पडतील असे उत्तम दिग्साधन,विनाचुण्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम व नक्षत्रावर अनेक कोनांचा पाया हि मंदिराचे वस्तू वैशिष्ट्य होय. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या आवारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती यांची अनेक देवळे आणि काशी, मनकर्णिका कुंडे आहेत. कोल्हापूर मधील महालक्ष्मी मंदिराच्या चारही दिशांना एक एक दरवाजा आहे. या मंदिरातील खांबे न मोजता येणारे आहेत.
अंबाबाईच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून अनेक भाविक येत असतात. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या जगभरातील लाखो भाविकांसाठी महालक्ष्मी अन्नछत्रसेवा ट्रस्टमार्फत भोजन प्रसाद मोफत देण्यात येतो. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी अल्प दरात राहण्याची सोय व्हावी म्हणून सर्व सोयींनी युक्त अशी धर्मशाळा उभारली आहे. इथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही धर्मशाळा बांधण्यात आली आहे. ही धर्मशाळा मंदिरापासून अगदी जवळ आहे.