Dassera great indian festival:-दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिला जातात. या सणानिमित्त नवीन कपडे खरेदी केले जातात. तसेच सोने-चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जातात. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. दसरा या सणाला यंत्र वाहने यांची पूजा करून झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.
दसरा-Dassera great indian festival हा सण अश्विन शुक्ल दशमीला साजरा केला जातो.दसरा सण अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा दिवस आहे. यश कीर्ती प्राप्त करायची, धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस आहे
दसरा हा सण साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा प्रारंभ इत्यादी चांगल्या गोष्टी केला जातात. घर, गाडी, बंगला खरेदी केले जातात, सोने, चांदीचे दागिने खरेदी केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. या दिवशी घरोघरी गोड गोड जेवणाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने म्हणजेच सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना देतात व त्यांच्या पाया पडतात व लाख मोलाचे आशीर्वाद घेतात.
भगवान रामाने या दिवशी रावणाचा वध केला होता. या सणाला असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो म्हणून या दशमीला रामाच्या विजयाचे प्रतीक म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात.
दसरा या सणाचा संबंध नवरात्रीशी देखील आहे कारण नवरात्रीच्या नंतरच हा सण साजरा करतात आणि या सणांमध्ये महिषासुराच्या विरोधात देवी आईच्या धाडसी कार्याचा उल्लेख देखील आहे. दसरा किंवा विजयादशमी नवरात्राच्या नंतर दहाव्या दिवशी साजरा करतात
रावणाने माता सीतेला हरून लंकेत नेले भगवान राम हे युद्धाची देवी आई दुर्गेचे भक्त होते त्यांनी युद्धाच्या काळात पहिल्या नऊ दिवसापर्यंत आई दुर्गेची पूजा केली आणि दहाव्या दिवशी दुष्ट रावणाचा संहार केला, म्हणून विजयादशमी हा एक महत्त्वाचा दिवस आहे.
नवरात्रामध्ये स्त्रिया नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ रंगाचे वस्त्र परिधान करून देवी जगदंबेच्या वेगवेगळ्या रूपाची उपासना करून सामर्थ्यवान राहण्याची इच्छा करतात. नंतर दांडिया खेळतात व नृत्य सदर करतात.
दसऱ्याचा सण मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी जागोजागी मोठ्या जत्रा भरतात याचा आनंद लुटण्यासाठी लोक आपल्या मित्र आणि कुटुंबासह येतात आणि मोकळ्या आकाशाखाली जत्रेचा चा पुरेपूर आनंद घेतात. जत्रेमध्ये वेगवेगळ्या रंगीत बांगड्या, वस्तू, खेळणे, कपडे त्याचबरोबर पाळणे , खाण्याच्या पदार्थाचा भांडार असतो
नवरात्रात बऱ्याच ठिकाणी रामलीला देखील सादर केली जाते.या दिवशी रावण, कुंभकरण, मेघनाथ यांचे पुतळे पेटवतात. काही कलाकार राम, सीता आणि लक्ष्मणाचा वेश धारण करून येतात आणि आगीच्या बाणाने या पुतळ्याला बाण मारतात, जे फटाक्याने भरलेले असतात. पुतळ्यात आग लागताच तो पुतळा पेटतो आणि त्यामधील फटाके फुटतात आणि यामुळे त्याचा अंत होतो हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक आहे
दसरा या सणाच्या दिवशी एकमेकांना सोन्याच्या रुपात आपट्याचे पानं दिली जातात या दिवशी सीमोलंघन, सरस्वती पूजन, शमीपूजन, शस्त्रांचे पूजन आणि अपराजिता पूजन केले जाते दसरा या सणा दिवशी तिन्ही सांजेला गावाबाहेर जात आपल्या गावाची सीमा ओलांडतात व तेथे जाऊन आपट्याचे आणि शमीचे पूजन करून त्या ठिकाणी अपराजिता देवीची स्थापना करतात व तिला विजया करता वर मागतात.
या दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता व प्रभू रामचंद्राने दिवशी रावणाचा वध केला होता. पांडव ही अज्ञातवासात राहण्याकरता गेले होते त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञात वास संपल्यावर तेथे त्यांनी परत ती शास्त्र घेतली व त्या झाडाची पूजा केली तोच हा दिवस.
दसऱ्याच्या दिवशी सोन्याची म्हणजेच आपट्याची आपट्याच्या पानांची देवान – घेवाण करून सायंकाळी उशिरा घरी येण्याची प्रथा आहे.
सायंकाळी सोने लुटणे मोरू परतूनी आला,!!
बहिण काशी ओवाळी मग त्याला !!
दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा!!
आपट्याच्या पानाला सोन्याचं मोल का? आणि कसा आलं? याबद्दल जी एक कथा सांगितली जाते ती अशी की फार फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे एक गुरु आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांच्याकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करत होता. एकदा काय झाले गुरु वरतंतू यांच्याकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले -गुरुजी! तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले शहाणे केले त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी.
त्यावर गुरु वरतंतू म्हणाले बाळ कौत्सा अरे ज्ञान हे दान करायचे असते त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो अरे तुम्ही शहाणे झाला, ज्ञानी झालात हीच माझी गुरुदक्षणा. पण कौत्स मात्र काही एकेना सारखा मी काय देऊ? असे विचारू लागला. मग गुरु म्हणाले मी तुला 14 विद्या शिकवल्या म्हणून तू मला 14 कोटी सुवर्ण मोहरा दे. कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू पण प्रत्यक्षात ते जमेना मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना 14 कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती.
दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजाने कौत्साला तू तीन दिवसांनी ये असं सांगितलं. रघु राजाने कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला पण धन येईना मग रघुराजाने युद्धाची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळली इंद्र घाबरला त्याने कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली.
दुसऱ्या दिवशी रघु राजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्याने स्वतः त्या मुद्रांचा ढीग पाहिला. दारी आलेल्या कौत्साला हवं तेवढं धन घे म्हटलं पण त्याने गुरुदक्षिणेपुरतेच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजांना प्रजेला वाटल्या, लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता, त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला या दिवशी सोनं म्हणून देतात व घेतात.
दसरा किंवा विजयादशमी हा सण मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. दसरा हा सण विजयाचे,शुरतेचे व पराक्रमाचे प्रतिक आहे.