हिंदू संस्कृतीमध्ये होळी-holi या सणाला खूप महत्त्व आहे. होळी हा सण वसंत ऋतू मध्ये साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा, पद्धत वेगवेगळी आहे, पण तितकीच ती खास आणि आकर्षक देखील आहे.

होळी-holi हा सण दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकावर रंग उडवून होळी खेळली जाते, त्याला धुलीवंदन किंवा धुळवड असे म्हणतात. होळी या सणाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते.

जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तशीच होळी-holi साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. पूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता तो स्वतःला खूप बलवान, शक्तिशाली समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची देखील घृणा करायचा, तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव देखील ऐकणे पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल, परंतु भक्त प्रल्हाद न घाबरता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे.

ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच, कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलीकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले.

प्रल्हाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलीकेला आठवलं की तिला वरदानात असे सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले. दुसऱ्या दिवशी हा सण रंगांनी साजरा करू लागले.

भारतातील वेगवेगळ्या भागात होळी या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. संपूर्ण भारतात होळी साजरी होते पण महाराष्ट्रात कोकण भागात होळीचे महत्त्व अधिक आहे. कोकणात होळी या सणाला “शिमगा” असे म्हणतात. कोकणामध्ये हा उत्सव पंधरा दिवस चालतो.

समुद्रकिनाऱ्यावरील बंदरावर राहणारा कोळी समाजही होळी पेटवतो आणि दुसऱ्या दिवशी नाव सजवुन समुद्रात नेऊन नावेची पूजा करतात. होळीचा दुसरा दिवस धुळवडीचा. होळी शांत झाल्यावर तिची राख अंगाला लावण्याची प्रथा आहे. होळीच्या नंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. उन्हाळ्याची चाहूल लागण्याने वातावरणातील उष्णता सहन व्हावी म्हणून अंगावर पाणी उडवले जाते.

मध्ययुगात राजे राजवाडे आणि संस्थानिक पाण्यात केशर कालवून त्याने होळीचे महत्त्व सांगुन होळी साजरी करायचे.

होळीनिमित्त भारतामध्ये विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भारतात विविध ठिकाणी निरनिराळे खाद्यपदार्थ करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात होळीचा सण पुरणपोळीचा आस्वाद घेतल्याशिवाय अपूर्णच. पुरणपोळी हा एक पारंपारिक गोड पदार्थ असून तो आवर्जून घरोघरी केला जातो. गरमागरम पोळी, तूप, दूध आणि आमटी असा बेत असतो.

होळी या सणाला जसे धार्मिक महत्त्व आहे तसेच शास्त्रीय महत्त्व देखील आहे होळी दहन माणसाने ‘आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाऊन राग करावी’ या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. या आनंदात शेणाच्या गौऱ्या व लाकडे हे उभी गोलाकार ठेवून होळीचे दहन करतात. होळी दहन करताना होळीमध्ये नारळ टाकतात व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. होळी पेटवल्याच्या नंतर होळीभोवती फेऱ्या मारल्या जातात

होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख अंगाला लावण्याची प्रथा आहे.

होळीचे मानसिक दृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचा  द्वेष असतो. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे द्वेष, राग बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा एक भाग आहे. आपले मन स्वच्छ व्हावे आणि स्नेहाचे, प्रेमाचे एक नवे पर्व आपण दुसऱ्या दिवसापासून सुरू करावे अशी अपेक्षा असते.घरात भरभरून आलेल्या धान्यातूनच नैवेद्य होळीला दाखवून पंचमहाभूतांचे आभार मानले जातात. निसर्गाने दिलेल्या दानाची जाणीव ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला आहे एक आदर्श आहे.

होळी हा सण एकमेका मध्ये एकता निर्माण करतो. प्रेम, आनंद व उत्साह वाढवतो. होळी हा सण एकमेकांना सहकार्य करण्याची शिकवण देतो. आजकाल होळी खेळताना बरेच लोक केमिकलयुक्त रंगाचा वापर करतात, परंतु हे रंग आपल्या शरीराची त्वचा व डोळ्यांना घातक ठरतात म्हणून होळी खेळताना कोरड्या गुलालचा वापर करावा व नैसर्गिक रंग लावावेत अनेक ठिकाणी होळी खेळण्यासाठी फुग्यांचा वापर केला जातो आणि ते फुगे एकमेकांवर मारले जातात.

काही ठिकाणी भांग पिणे हा देखील होळीचा एक भाग आहे. भांग पिऊन नशेत मदमस्त होऊन एकमेकांची चूक भूल माफ करून नाचत होळी खेळली जाते. अशाप्रकारे भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे होळी हा सण साजरा केला जातो.

होळी हा सण आनंदाचा, रंगाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा. “होली हैं भाई होली हैं बुरा मत मनो होली है” .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *