Yedeshwari Mandir : येडेश्वरी मंदिर येरमाळा

Yedeshwari Mandir येडेश्वरी देवीचे मंदिर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली श्री तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून Yedeshwari Mandir येडेश्वरी देवीला ओळखले जाते.

Yedeshwari Mandir येडेश्वरी मंदिर स्थापनेची कथा अशी आहे की, प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला गेले होते, तेव्हा सीतामातेचे  ज्यावेळेस अपहरण झाले होते तेव्हा, प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात वनामध्ये इकडे तिकडे फिरत होते. सीतेच्या शोधामध्ये प्रभू रामचंद्र या वनामध्ये आले. रामाचे हे दुःख पार्वती मातेला सहन न झाल्यामुळे पार्वती मातेने सीतेचा अवतार घेतला व प्रभू रामचंद्राच्या समोर आल्या. सीतेचे रुप घेतलेल्या पार्वती मातेला प्रभू श्रीराम म्हणाले, आई तू “वेडी आहेस” का? मी तुला ओळखले आहे. प्रभू श्रीरामाने पार्वती मातेला विनंती केली की, तुम्ही भाविकांचे भले करण्यासाठी या डोंगरावरतीच रहा. म्हणून पार्वती मातेच्या या रूपाला येडेश्वरी देवी असे म्हटले जाते. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली.

देवीच्या दर्शनासाठी 204 पायऱ्या चढून वर जावे लागते. पायऱ्याच्या दोन्ही बाजूला पूजेच्या साहित्याची दुकाने आहेत. हे मंदिर खूप प्राचीन आहे. आई येडेश्वरी ची मूर्ती ही स्वयंभू आणि पाषाणांमध्ये आहे. मूर्तीचे तेजस्वी डोळे आहेत. नऊवारी साडी घातलेले देवीचे हे तेजस्वी रूप पाहून डोळे दिपून जातात. श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराच्या कडेने मारुती मंदिर, दत्त मंदिर, गणपती मंदिर, महादेव मंदिर, म्हसोबा मंदिर, नृसिंह मंदिर, जनाई मंदिर, खंडोबा मंदिर, तुळजाभवानी मंदिर आणि मातंगी मंदिर अशी मंदिरे आहेत. देवीची दररोज नित्य महापूजा, अभिषेक, आरती व पंचारती केली जाते.

वर्षभरातील श्रावणी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा व नवरात्र महोत्सवात देवीची यात्रा भरते. यात्रेसाठी महाराष्ट्रासह पर राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. नवरात्रातही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

यामध्ये चैत्र पौर्णिमेला सर्वात मोठी यात्रा असते. त्यामध्येपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवीची पालखी येरमाळा गावातील चुन्याच्या रानात येते. भाविकांसाठी चुना वेचण्याचे खूप महत्त्व आहे. पालखी चुन्याच्या रानात आल्यावर भाविक चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकतात. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडतो. एरवी बारा महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होते. अशी पूर्वीपासून  मान्यता आहे. तिथून पालखी आमराईत जाते व तिथे पालखीचा पाच दिवस मुक्काम असतो.  पाच दिवसानंतर देवीच्या पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान होते. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबील आदींचा नैवेद्य देवीला दाखवला जातो.

येरमाळा येथील लोक व इतर भाविक येडेश्वरी देवीला जागृत दैवत मानतात. हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले येडेश्वरी देवीचे देवस्थान हे महाराष्ट्रातील अत्यंत जागृत देवस्थान आहे

Leave a comment