Gajanan Maharaj : गजानन महाराज मंदिर शेगाव

श्री संत Gajanan maharaj गजानन महाराज मंदिर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणी आहे. हे मंदिर संत  Gajanan maharaj गजानन महाराज यांचे पवित्र निवासस्थान असून त्यांच्या अनुयायांमध्ये अत्यंत श्रद्धेने पुजले जाते. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये गणले जाणारे शेगाव या ठिकाणी गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात.

संत गजानन महाराज हे 19 व्या शतकातील महान संत होते. ज्यांनी अध्यात्मिक साधना, भक्ती आणि मानव सेवेचे धडे दिले. मिळेल ते खाणे, मिळेल त्या जागी राहणे, नेहमी भ्रमण करणे अशी त्यांची दिनचर्या होती. त्यांच्या मुखात परमेश्वराचेच नामस्मरण, भजन असायचे. भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून देण्याचे शेकडो उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत. गजानन महाराज संस्थान हे विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट असून शिस्तबद्ध, प्रामाणिक, अध्यात्मिक, वैद्यकीय आणि सामाजिक कार्यासाठी सुप्रसिद्ध आहे. मंदिरात सेवेकरी म्हणून काम करू इच्छिणाऱ्या भक्तांची प्रतीक्षा यादी असून त्यासाठी काही वर्षे सुद्धा वाट पाहावी लागते. मंदिराचे व्यवस्थापन प्रामाणिकपणा, अत्यंत साधेपणा आणि यात्रेकरू अथवा वारकरी यांच्या विषयी आदर बाळगणारे आहे. सेवाधारी भक्त आपल्या गुरु प्रेमासाठी नम्रपणे स्वयंसेवक म्हणून काम करतात. हजारो लोकांना मोफत अन्न वाटप केले जाते. भारतात SAP तंत्रज्ञान आत्मसात करणारे हे पहिले मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे शेगावला दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंची किंवा वारकऱ्यांची उत्तम काळजी घेणारे संस्था म्हणून देखील प्रसिद्ध आहे. श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी भक्तनिवास, आनंदसागर संकुल, विसावा इत्यादी ठिकाणी राहण्याची सोय, स्वच्छ सुविधा आणि भोजन माफक दरामध्ये पुरवले जाते. मंदिर परिसरात महाराजांच्या भक्तांना दररोज महाप्रसाद दिला जातो. लोकसेवा ही ईश्वर सेवा या तत्त्वावर अनेक समाजसेवा उपक्रम सुद्धा श्री गजानन महाराज संस्थान चालवते.

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावात संत गजानन महाराज राहत होते. त्यांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी संजीवन समाधी घेतली. त्यांच्या समाधीची ही तिथी दरवर्षी श्री पुण्यतिथी उत्सवाचा भाग म्हणून स्मरणात ठेवली जाते.

शेगाव मंदिर हे संत गजानन महाराजांची समाधी आहे. काहीजण असे म्हणतात की, मंदिराची जागा स्वतः संत गजानन महाराजांनी 1908 मध्ये सुचवली होती. मंदिर सुंदर संगमरवरी दगडांनी बांधलेले आहे. समाधी मंदिराबरोबरच राम देवी सीता इत्यादी देवतांची मंदिरे बांधण्यात आली. मंदिराच्या आत पवित्र पादुका आहेत. संत गजानन महाराज दररोज या पादुकांचा वापर करत असत. मंदिरात पालखी सोहळा होतो. मंदिराच्या सभा मंडपात संत गजानन महाराजांच्या जीवनातील विविध देखावे सुंदर कोरलेले आहेत. गजानन महाराजांनी निर्देश केलेल्या जागी एक शीला ठेवली आणि त्याच्या आजूबाजूला मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली. ही जागा शेगावच्या मध्यभागी आहे. मूळ मंदिराचे बांधकाम दगड, चुना आणि रेतीचे आहे. आज मुख्य मंदिराच्या तळघरात जिथे शीला ठेवली होती तिथे श्री गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. या जागेला भुयार म्हणतात. भुयारात प्रवेश केल्यावर श्री गजानन महाराजांचे दर्शन होते. भुयारात आतल्या बाजूने आता संगमरवराच्या लाद्या बसवण्यात आल्या आहेत. 1909 साली मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली. मंदिराच्या पूर्वीच्या दगडी भिंतीवर पौराणिक काळातील व्यक्तिरेखा कोरल्या होत्या. समाधी शताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून हा फोडलेला भाग आणि दगडी शिखरांचा भाग 2009 मध्ये उतरवण्यात आला उतरवलेल्या भिंती आणि शिखरांची पुनर्रचना करून मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला.

महाराजांचे दर्शन घेऊन भक्त भुयारातून तळमजल्यावर राम मंदिरात प्रवेश करतात. अशी रचना करण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे. संतांकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात म्हणून, महाराजांचे दर्शन घेऊन भुयारातून बाहेर पडल्यावर भक्त रामाच्या दर्शनासाठी जातात. याच राम मंदिरात महाराजांच्या पालखीत ठेवण्यात येणारे चांदीचे दोन मुखवटे आहेत. राम आणि हनुमान मंदिराला जोडणाऱ्या सभामंडपातील आतल्या भागात महिरपीच्या वरच्या भागात महाराजांच्या पोथीतील विविध लीला चित्रबद्ध केल्या आहेत. या सभामंडपात सर्वत्र रेखीव कमानी आहेत. पूर्वीच्या दगडाच्या बांधकामावर रंग चढवल्यामुळे त्या अधिक आकर्षक दिसतात. मुख्य मंदिराच्या आग्नेयस महाराजांची जेथे समाधी घेतली तेथे आज संगमरवरी पादुका आहेत. त्याच्या पाठीमागे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असून त्या जागेला समाधीस्थळ म्हणतात. त्याला लागूनच महाराजांचे शयनगृह आहे. महाराजांच्या वापरातील पलंग तेथे ठेवला असून त्यावर दोन बाजूला दोन लोड आहेत आणि मध्यभागी महाराजांचा फोटो आहे. समाधी ग्रहण स्थळाच्या डाव्या बाजूला महाराजांनी त्याकाळी प्रज्वलित केलेली धुनी आजही धगधगत असून शेजारी श्रींनी वापरलेले चिमटे येथे ठेवण्यात आले आहेत. एक सेवक धुनी अखंड तेवत ठेवतो. शिवाय अनेक भक्त त्यात तूप, तुपाची वात, गांजा इत्यादी साहित्याची भर घालतात. मुख्य मंदिराच्या भोवती पटांगण आहे आणि त्यातील त्याला चारही बाजूंनी दगडी पाठशाळेने वेढलेले आहे. पाठशाळेला जागोजागी सुंदर कमानी आहेत.

मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला नागदेवता मंदिर आणि महाराजांचे सेवक श्री बाळाभाऊ महाराज व श्री नारायण महाराज यांच्या समाधी आहेत. समाधी ग्रहण स्थळ आणि शयनगृहाच्या समोर पारायण मंडप आहे. पाठशाळेला लागूनच दोन प्रवेशद्वार आहेत. उत्तरेकडे मंदिरात येण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार असून पश्चिमेला दुसरे प्रवेशद्वार आहे.

श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन फेब्रुवारी महिन्यात तसेच त्यांची पुण्यतिथी ऋषिपंचमीला हे येथील प्रमुख उत्सव आहेत. त्यावेळी येथे रोषणाई केली जाते. महाराजांची  हत्ती, घोडा, रथ, पालखी, दिंडी इत्यादी सोबत मिरवणूक निघते.

Leave a comment