कंकालेश्वर मंदिर बीड

Kankaleshwar Mandir कंकालेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील बीड शहरात आहे.

हे मंदिर दशावतारी आहे. पुरातन भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. 84 मीटर चौकोनी आकाराच्या तलावाच्या मधोमध हे शिवमंदिर असून, बिंदुसरा नदीच्या काठावर आहे. मंदिरात जाताना पाण्यात असलेल्या दगडी पुलावरून जावे लागते. उन्हाळ्यातही येथील पाणी पूर्णतः आटत नाही. चारही बाजूने भरभक्कम व नक्षीदार खांब असे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सुंदर अशी भगवान महादेवाची पिंड आहे. आत जाताना मोठा नंदी आहे. उजव्या बाजूच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या तीन मनमोहक अशा मुर्त्या दिसून येतात. डाव्या बाजूला संकट मोचक हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराचा आकार स्टार फिश प्रमाणे असून मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भ ग्रह आहे ते अनेक वर्षापासून बंद आहे. कंकालेश्वर मंदिर अनेक वर्ष बंद होते. 17 सप्टेंबर 1948 रोजी म्हणजेच हैदराबाद स्वातंत्र्य दिना दिवशी हे मंदिर खऱ्या अर्थाने मुक्त झाले.

असे म्हणतात की, 10 ते 11 व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने हे मंदिर बांधले. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असायच्या त्यामुळे या मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांचे देखील शिल्पांकन करण्यात आले आहे. या मंदिरात आणि त्यांच्या स्तंभावर ग्रीक शिल्पकलेची छाप पाहायला मिळते. Kankaleshwar Mandir कंकालेश्वर मंदिर हे पश्चिमाभिमुख असून मुख्य मंडप त्याच्यामागे अर्धमंडप आणि या मंडपाला जोडून तीन बाजूंना अंतराळयुक्त गर्भग्रह असा या मंदिरातचा तलविन्यास आहे. ही तीनही गर्भगृहे सारख्याच आकाराची असून त्यांचा तलविन्यास तारकाकृती आहे. या मंदिराचा मंडप अष्टकोनी आकाराचा आहे. मंडपाच्या चार मुख्य दिशांना आणि चार उपदिशांना दोन स्तंभ किंवा एक स्तंभ जोडी आहे. या 16 स्तंभांवर घुमटाकार छत पेरलेले आहे. हे छत उत्तरोत्तर लहान होत गेलेल्या वर्तुळाकृती वलयांनी बनलेले आहे. छतावर फुलांची नक्षी आणि अलंकार आहेत. छताच्या मध्यभागी सर्वात वर कमळ आहे. मंदिराच्या बाहेरील भागात विविध थर असून सगळ्यात खालचा थर चौकटच्या नक्षीने तर सगळ्यात वरचा थर कीर्तीमुखांनी अलंकृत केलेला आहे. मंदिराच्या बाहेरील अंगाच्या भद्रावरील देवकुष्टांमध्ये शक्ती, ब्रह्मदेव आणि शिव संप्रदायातील देव देवता आहेत. मुख्य गर्भग्रहाच्या ललाटावर गणेशमूर्ती आहे.

हे मंदिर विलक्षण सुंदर असून कोरीवकाम, शिल्पकला लक्षवेधून घेते. शेकडो वर्षे जुने हे मंदिर पाहता क्षणी आवडावे असे आहे. या मंदिरात महाशिवरात्री श्रावणी सोमवार या दिवशी भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराचे काम, स्थापत्यशैली पाहण्यासाठी इतिहास प्रेमी पर्यटक आवर्जून भेट देतात.

Leave a comment