Khandoba Mandir खंडोबा मंदिर हे बीड शहरात आहे. बीड शहराच्या पूर्व सीमेवर छोट्याशा टेकडीवर गर्द वनराईत पूर्वाभिमुख खंडोबाचे मंदिर आहे. हे मंदिर खूप जुने आहे आणि दगडी बांधकाम आहे. या ठिकाणी कुठलाही चुना किंवा सिमेंट वापरलेले नाही. फक्त दगडावर दगड मांडून या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. खंडोबा मंदिर अत्यंत जुने असून दिसण्यास अत्यंत सुंदर आहे. हे मंदिर खूप जुने असल्यामुळे व हा खंडोबा नवसाला पावणारा खंडोबा म्हणून याची महती आहे.
या मंदिरास चारही बाजूने वरांडा असून त्याचे छत 22 खांबावर आधारित आहे. मंदिरास चार खांबी सभामंडप असून पूर्वाभिमुख मुख्य प्रवेशद्वार व दक्षिण व उत्तर दिशेला आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. गर्भ ग्रहातील मागील भिंतीच्या कोनाड्यात हातात तलवार असलेली घोड्यावर अरुढ खंडोबा व म्हाळसा यांची दगडी मूर्ती आहे. गर्भग्रहावरील शिखर सुंदर सजवलेले असून शिखरावर प्राणी व देवतांचे चित्र कोरलेली आहेत. मंदिराचे बांधकाम मराठा शैलीतील असून मंदिरासमोर वीट बांधकामातील सहा मजली अष्टकोनी दीपमाळ आहेत. या दीपमाळांवर मानवी व प्राण्यांच्या आकृत्या चुन्यामध्ये बनवण्यात आल्या आहेत. या मंदिरातील दीपमाळा एवढ्या उंच आहेत की, त्या दीपमाळावर चढल्यानंतर संपूर्ण बीड तालुका या दीपमाळावरून दिसतो. हे मंदिर त्याची स्थापत्य रचना व शिल्प कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे.
विशेष म्हणजे अनेक लोक प्रत्येक रविवारी येथे येऊन मनोभावे पूजा करतात. अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. खंडोबा मंदिरात बोगदा आहे. या मंदिरापासून बीडच्या बलभीम चौकापर्यंत बोगद्यातून येत. आता हा बोगदा बंद आहे. राज्य पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारकाच्या यादीत या मंदिराचा समावेश केला असून मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत.