Mohatadevi Mandir : मोहटादेवी मंदिर पाथर्डी

Mohatadevi Mandir मोहटादेवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील देवीच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. माहूरगड निवासिनी श्री रेणुका मातेचा अंशावतार म्हणजेच श्री मोहटादेवी होय. श्री क्षेत्र Mohatadevi मोहटादेवी गडाचा परिसर म्हणजे गर्भगिरी पर्वतरांगेतील होय. याच रांगेतील मोहटा गावालगतच्या उंच आशा डोंगरावर श्री रेणुका मातेने अवतार धारण केला.

जेव्हा जेव्हा मनुष्यास दुःख प्राप्त होते, तेव्हा तेव्हा भगवान पृथ्वीवर अनेक रूपाने अवतार धारण करून धर्म संस्थापना व मानवाचे कल्याण करतात. याच न्यायाने श्री रेणुका मातेने गर्भगिरी पर्वतरांगेतील मोहटा गावालगाच्या उंच अशा डोंगरावर अवतार धारण केला. स्वयंभू म्हणजे स्वनिर्मित देवी, स्वतः प्रकट झालेली. सामान्य माणसाच्या अंतकरणात उत्पन्न झालेला मोहरूपी राक्षस मानवाचे जीवन उध्वस्त करू लागला हे पाहून मोहटादेवीच्या रूपाने श्री रेणुका मातेने अवतार धारण करून या मोहरूपी राक्षसाचा पराभव केला.

मंदिर परिसरातील पूर्वीचे जुने मंदिर पूर्णपणे हटवून त्या जागेवर देवस्थानातील सुख सोयींनी युक्त असे दर्शन रांगेसह बांधकाम झाले आहे. मोहटा देवी या भव्य मंदिर बांधकामासाठी राजस्थानातील जैसलमेर येथून दगड आणण्यात आले होते. मंदिराच्या शिलाखंडावर दीड वर्ष नक्षीकाम कोरीव काम सुरू होते. मंदिराचे खांब उभे करण्याचे कसरतीचे काम पूर्ण झालेले आहे. देवी भक्तांच्या देणग्यामधून व दानांमधून दक्षिण भारतीय पद्धतीचे हे मंदिर उभारण्यात आले आहे. या देवस्थानाच्या आवारात पाच मजली इमारत, भक्त निवास, भोजन कक्ष, व्ही.आय.पी. निवासाची सोय, देवस्थान समिती कार्यालय, देवस्थान समितीचे चेअरमन पदाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय उभारले असून कीर्तन भजन यासाठी एक भव्य मंडप उभारला आहे.

देवीची आरती दिवसभरातून तीन वेळा होते. भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर खुले असते. नवरात्रात येथे शारदीय महोत्सवाचे आयोजन केले जाते. हा उत्सव पंधरा दिवस साजरा केला जातो. मोहटा गडाच्या पायथ्याला असणाऱ्या मोहटा गावातून देवीची पालखी मिरवणूक काढली जाते. नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटादेवीची ख्याती आहे.

एक दिवस मोहटा गावामध्ये एकदा वाट चुकलेल्या म्हशी आल्या. म्हशी काही दिवस सांभाळून ज्यांच्या असतील त्यांना देऊ अशी भावना ठेवून ग्रामस्थांनी त्या ठेवून घेतल्या. अनेक दिवस वाट  पाहुनही कोणी आले नाही. मात्र ही वार्ता मोघलांच्या नोकरांना कळाली व त्यांनी म्हशी चोरीचा आरोप भक्तांवर केला आणि त्यांना बोलवून बंदिस्त करण्याचे आदेश दिले. भक्तास खूप दुःख झाले. दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांनी मोहटादेवीची आराधना केली. खडा पहारा केला. उपवास केला व नवस केला. आई यापुढे आम्ही गाई-म्हशीचे तूप, दूध विकणार नाहीत आणि तुला अर्पण केल्याशिवाय खाणार नाहीत, परंतु हे संकट निवारण कर. आम्ही कोणत्याही प्रकारची चोरी केली नाही. भक्तांची भावना व सत्य संकल्पना पाहून मोहटा देवी प्रसन्न झाली. दुसऱ्या दिवशी बंदिस्त करण्यास येणार होते परंतु, ते आले नाहीत आणि पाहतात तर रात्रीतून म्हशीचा काळा रंग बदलून पांढरा झाला. आदल्या दिवशी पाहिलेल्या या म्हशी नाहीत, हे नाकेदारांच्या लक्षात आले व त्यांनी बंदिस्त करण्याचा हुकूम रद्द केला. तेव्हापासून आजपर्यंत दहिफळे घरातील घराण्यातील लोक दुध, दही, तूप विकत नाहीत व देवीस अर्पण केल्याशिवाय खातही नाहीत.

Leave a comment