उद्देशपत्रिका (सरनामा) PREAMBLE म्हणजे घटनेचा प्राण किंवा आत्मा होय. ती घटनेची प्रस्ताविका आहे.
घटनाकारांनी भारतीय संविधानाचा सरनामा PREAMBLEही घटनेची गुरुकिल्ली मानलेली आहे.
सरनाम्याद्वारे घटनानिर्मितीमागचा उद्देश स्पष्ट होतो.
संविधानातील काही अस्पष्ट संधी किंवा उपबंध याचे निरसन करण्यासाठी सरनाम्याचा उपयोग होतो.
26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना परिषदेने सरनामा मंजूर केला, तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या उद्देश पत्रावर (Objectives Of Rasolution)आधारित आहे.
संविधानाच्या सरनाम्यामुळे प्रभावित झालेल्या केंब्रिज व हॉवर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अर्नेस्ट बारकर यांनी आपला द प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेअरी (The Principles of Social and Political Theory) हा ग्रंथ सरनाम्यास (उद्देशपत्रिकेत) समर्पित केला.
सरनाम्याचा अर्थ :
भारतीय संविधानाच्या सरनाम्यावरून पुढील तीन गोष्टी स्पष्ट होतात.
1.घटनेचे उगमस्थान
2.राज्यव्यवस्थेचे स्वरूप
3.राज्यव्यवस्थेचा उद्देश
1.घटनेचे उगमस्थान
घटनेचे उगमस्थान हे भारतीय जनता आहे. याचा अर्थ घटनाकारांनी बनवलेली घटना ही लोकांना मान्य असून भारतीय जनतेनेच ती स्वतःसाठी बनवली आहे असा होतो.
2.राज्यव्यवस्थेचे स्वरूप
सार्वभौम(Sovereign)
15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 या काळात स्वातंत्र्य भारताचे स्थान हे वसाहतीचे स्वातंत्र्य असे होते, कारण त्यावेळी घटना अमलात नव्हती. 26 जानेवारी 1950 रोजी घटनेच्या अंमलबजावणीमुळे भारत हे सार्वभौम राष्ट्र बनले म्हणजेच, अंतर्गत व बहिर्गतरित्या भारतावर आता कोणाचेही वर्चस्व राहिलेले नाही. म्हणजेच भारत हा इतर कोणत्याही देशाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली नाही. अंतर्गत आणि बाह्य परदेशी संबंध निर्माण करण्यास भारत स्वतंत्र आहे,
समाजवादी(Socialist)
भारताला साम्यवादी अथवा भांडवलशाही अर्थव्यवस्था मान्य नाही. भांडवलदारांपासून श्रमिकांचे शोषण थांबवण्यासाठी उत्पादनाची साधने व वितरणावर सामाजिक मालकी वा नियंत्रण ठेवणारी समाजवादी राज्यव्यवस्था भारताने स्वीकारली आहे.
धर्मनिरपेक्ष(Secular)
भारतात धर्म हा व्यक्तीची खाजगी व ऐच्छिक बाब असून प्रत्येकाला स्वच्छेने कोणत्याही धर्माचा अवलंब करता येईल, मात्र सार्वजनिक बाबतीत धर्माची ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही. कोणत्याही धर्माला अनुसरून राज्यकारभार केला जाणार नाही.
लोकशाही(Democratic)
लोकशाही म्हणजे “लोकांवरती शासन”. लोकांवरती शासन म्हणजेच सार्वभौम अशा भारतीय जनतेकडे देशाची अंतिम सत्ता आहे.
गणराज्य(Republic)
गणराज्य म्हणजे राजा नसलेले राज्य. गणराज्यात सर्वोच्च शासन प्रमुख हा लोकनियुक्त असतो. भारतीय गणराज्यात सर्वोच्च शासन हा राष्ट्रपती असून तो इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंशपरंपरागतरीत्या पद धारण करत नसतो. त्याची निवड जनतेद्वारे अप्रत्यक्षपणे होते.
3.राज्यव्यवस्थेचा उद्देश
भारताच्या सर्व नागरिकांना,
न्याय – सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक
स्वातंत्र्य – विचार, अभिव्यक्ती(उच्चार), श्रद्धा, धर्म व उपासना यांचे
समता – दर्जा आणि समान संधी याबाबत
बंधुता – व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता राखणारी बंधुता मिळवून देणे हा भारतीय राज्यघटनेचा उद्देश आहे.
18 डिसेंबर 1976 रोजी 42 व्या घटनादुरुस्तीने सरनाम्यात दुरुस्ती करून समाजवादी धर्मनिरपेक्ष व राष्ट्राची एकात्मता(अखंडता) हे शब्द समाविष्ट करण्यात आले.
धर्मनिरपेक्ष कोणत्याही धर्माला अनुसरून राज्यकारभार केला जाणार नाही.
अखंडता भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही भारतातील अखंडता टिकून राहील.