Shree Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आहे. Shree Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते.
दत्त परंपरा सांभाळणारे एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु अशी ओळख असणारे अक्कलकोटचे स्वामी श्री स्वामी समर्थ हे सर्वांनाच परिचित आहेत. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्य ऐकले किंवा वाचले की, लगेच आपल्या डोळ्यासमोर श्री स्वामी समर्थ उभे राहतात. भारतासह ते अनेक राज्यांमध्ये देखील प्रसिद्ध असून त्यांनी संपूर्ण भारतीय उपखंडात भटकंती करून ज्ञान प्राप्त केले आणि महाराष्ट्राच्या अक्कलकोट या गावी स्थायिक झाले.
दत्त संप्रदायात त्यांचं स्वरूप हे दत्ताचा चौथा अवतार मानन्यात आला. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामींचे सुद्धा भक्त झाले. अक्कलकोट तालुका हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर आहे स्वामी समर्थ हे 19व्या शतकातील एक आदरणीय संत आहेत. स्वामी समर्थ महाराज 1856 च्या सुमारास अक्कलकोट येथे आले आणि त्यांनी तेथे सुमारे 22 वर्ष घालवली. त्यांची आध्यात्मिक प्रवचनाची आणि चमत्काराची कीर्ती असंख्य अनुयायांना आकर्षित करते. 1878 मध्ये त्यांनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी त्या ठिकाणी एक मंदिर बांधले जिथे त्यांनी वटवृक्षाखाली ध्यान केले. मंदिरात स्वामी समर्थांची समाधी आणि मूळ वटवृक्ष आहे जे दोन्ही भक्तांसाठी केंद्रबिंदू आहेत.
स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधले आहे. याच वडाच्या झाडाखाली बसून स्वामी समर्थ ध्यान करत व भक्तांना उपदेश देत असत. या वटवृक्षाखालीच स्वामींनी आपला ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली. आजही हा वटवृक्ष स्वामींचे गुणगान गात उभा आहे. या परिसरात मारुतीचे मंदिर आणि शिवाची पिंड आहे. या परिसराच्या जवळ संस्थानाचे ऑफिस आहे. वटवृक्षाच्या बाजूला चोळप्पा महाराज मंदिर आहे. समाधी मठाच्या बाजूला असलेल्या चोळप्पा महाराजांच्या वाड्यात आपल्याला स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, स्वामींचा अंगरखा, रुद्राक्षमाळ व स्वामिनी दिलेल्या पादुकांचे दर्शन घेता येतं. मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
असे सांगितले जाते की, आंध्रप्रदेश राज्यांमधील एक पवित्र हिंदू शहर असणारे श्रीशैलम या शहराजवळील एका करदळीच्या जंगलामध्ये श्री स्वामी समर्थ प्रथमतः प्रकट झाले होते आणि याची पुष्टी म्हणजे त्यांनी आपल्या एका शिष्याला सांगताना म्हटले होते की, माझा उगम हा वृक्षापासून झाला आहे. स्वामी समर्थ यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रवास करत जगाची भटकंती केली. आयुष्यभर भ्रमंती करत त्यांनी काशी, जगन्नाथपुरी, गिरनार, हरिद्वार, काठीयावाड, रामेश्वरम इत्यादी महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना देखील भेट दिली तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठू माऊलीच्या पंढरपूर जवळील मंगळवेढा या ठिकाणी देखील त्यांनी बराच काळ वास्तव्य केले होते. त्यानंतर मात्र त्यांनी अक्कलकोट येथे कायमस्वरूपी आपले वास्तव्य केले.
अक्कलकोट येथे स्वामी प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपश्चर्या केली सर्वसामान्य भाविकांना त्यांनी आपलेसे केले. अनेक जाती धर्माचे लोक त्यांचे भक्त बनले. अशक्य हे शक्य करणारे स्वामींचे अक्कलकोट हे मुक्तीचे माहेरघर आहे.
1878 मध्ये अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली. गुरुपौर्णिमा आणि स्वामी समर्थ जयंती यासारखे उत्सव या मंदिरात साजरे केले जातात.