महाराष्ट्रातील धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे Tuljabhawani Mandir मंदिर आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजाभवानी मातेचे हे ऐतिहासिक मंदिर आहे. हिंदू धर्मातील आध्यात्मिक महत्त्व असलेली भवानी माता ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजापूरचे तुळजाभवानी देवीचे मंदिर हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे.
तुळजापूरची तुळजाभवानी माता ही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदनीय आहे आणि शिवरायांचे कुलदैवत आहे. भगवती देवी, भवानी माता म्हणून ओळखली जाणारी तुळजाभवानी देवी ही स्फूर्ती, भक्ती, शक्ती आणि प्रेरणेची प्रतीक असून भवानी माता ही महाराष्ट्राची कुलदेवता, आराध्य देवता आहे. भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देऊन स्वराज्यासाठी आशीर्वाद दिला होता असे दावे अनेकांकडून केले जातात.
महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन भव्य प्रवेशद्वार आहेत. त्यातील एका द्वाराला शहाजीराजांचे तर दुसऱ्या द्वाराला जिजाऊ मातेचे नाव दिलेले आहे. भवानी माता मंदिरात जाण्यासाठी आपल्याला दगडाच्या पायऱ्या पाहायला मिळतात. या दगडी पायऱ्या उतरून गेल्यानंतर भाविकांसाठी स्नान आणि हातपाय धुण्यासाठी गोमुख कुंड आहे. भाविक येथे स्नान करतात तसेच हात पाय धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली आहेत असे कल्लोळतीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा गणपती आहे, तिथेच आदिशक्ती, आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही आहे. त्याचबरोब श्री दत्त मंदिर, यमाई मंदिर, जेजुरी खंडोबा मंदिर इत्यादी मंदिर लक्ष वेधून घेतात. पुढे गेल्यावर मंदिराचे आवार आहे. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आलेली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते.
तुळजाभवानी मातेच्या मुख्य मंदिराचे द्वार हे चांदीच्या पत्राचे असून त्यावर विलक्षण असे नक्षीकाम केलेले आहे. चांदीच्या दरवाजातून आत भवानी मातेची काळ्या पाषाणातील प्रसन्न अशी मनमोहुन टाकणारी सुंदर तेजस्वी मूर्ती आहे. जवळपास तीन फुटांची ही तुळजाभवानी मातेची मूर्ती स्वयंभू आहे.
अष्टभुजा महिषासुरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या लटा बाहेर आलेल्या आहेत. भवानी मातेच्या मूर्तीला आठ हात असून त्या हातात त्रिशूल, बिचवा, बाण, चक्र, धनुष्य, शंख, पानपात्र, राक्षस शेंडी आहे. देवीच्या उजव्या व डाव्या बाजूला चंद्र, सूर्य आहे. पाठीवर बाणाचा भाता असून तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासुर राक्षसावर आहे,
तुळजाभवानी मातेची मूर्ती ही चलमूर्ती असून ती वर्षातून तीन ते चार वेळा गाभाऱ्यातून बाहेर काढली जाते. दसऱ्यात देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते. भवानी मातेचे मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळच नाही तर ते एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ देखील आहे. तुळजाभवानी मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व मंदिराच्या गुंतागुंतीच्या स्थापत्य वैभवाने भवानी मंदिर हे एक भाविक आणि पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. भारतीय हिंदू धर्मात भवानी मंदिराला आदरणीय स्थान दिले जाते. तुळजाभवानी मंदिर हे भवानी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले भवानी मंदिर हे भवानी मातेला समर्पित असलेले प्राचीन देवीचे मंदिर आहे समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले भवानी मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी व पर्यटनासाठी येत असतात. मुंबई सार्वजनिक कायदा 1950 नुसार पब्लिक ट्रस्ट म्हणून श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची 1962 साली नोंदणी झालेली आहे.
विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लानघांनाच्या वेळी भवानी मातेची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्री खंडोबा आणि महादेवाची ही मिरवणूक निघते.
महिषासुर नावाचा राक्षसा सर्व देवतांना खूप त्रास देत होता. तेव्हा ब्रह्म, विष्णू, महेश यांनी या राक्षसाला संपवण्यासाठी प्रचंड अग्नी निर्माण केली त्या अग्नीतून भवानी माता साकार झाली. आणि महिषासुर राक्षसा सोबत युद्ध केले. भवानी मातेने आपल्या तलवारीने महिषासुराचा वध केला होता त्यामुळेच भवानी मातेला महिषासुरमर्दिनी असेही म्हटले जाते.
तुळजाभवानी मंदिरातील सण आणि उत्सव:
रंगपंचमी – तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या परंपरेनुसार तुळजाभवानी मंदिरामध्ये दरवर्षी रंगपंचमीला पारंपारिक उत्सव साजरा केला जातो.
दसरा उत्सव – श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरांमधील दसरा हा एक पारंपारिक अद्भुत उत्सव आहे. विजयादशमीच्या दिवशी भवानी मातेची चलमूर्ती ही गाभाऱ्यातून बाहेर आणून मंदिरा आवारातील पिंपळाच्या पारावर ठेवली जाते व नंतर ती पालखीमध्ये ठेवली जाते व त्या पालखीची मिरवणूक काढली जाते. दसऱ्याच्या पालखी प्रदक्षिणामध्ये महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्त सामील होत असतात व पालखीवर हळदीकुंकवाची उधळण करून आनंद साजरा करतात.
नवरात्र उत्सव – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तुळजाभवानी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी महाराष्ट्रभरातून व बाहेरून देखील तुळजापूरला भवानी मातेच्या नवरात्र उत्सवामध्ये सामील होण्यासाठी भाविक, भक्त पायी चालत पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी मातेच्या चरणी सोन्याच्या पुतळ्यांची माळ अर्पण केली होती, ती नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या गळ्यात घातली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीच्या चरणी अर्पण केलेली ही माळ देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक होय. प्रतिवर्षी तुळजाभवानी मंदिरामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस तुळजाभवानी मातेची मनोभावे पूजा केली जाते. तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना, छबिना दररोज विविध प्रकारच्या पूजेचे आयोजन केले जाते
तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती ही चांदीच्या मेघडंबरीमध्ये ठेवून सोबत देवीच्या पादुका ठेवून त्याची तुळजाभवानी मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. यालाच श्री तुळजाभवानी मातेचा छबिना असे म्हणतात. तुळजाभवानी मातेचा छबिना हा महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी तसेच पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर, पौर्णिमेच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या एक दिवस नंतर काढला जातो.