Climate Of India : भारताचे हवामान

Climate Of India

भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हवामानात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते.

भारताच्या वायव्य भागात अतिउष्ण व कोरडा वाळवंटी प्रदेश आहे तर भारताच्या ईशान्य भागात मेघालय प्रदेशात जगातील सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश आहे.

हिमालयातील अतिउंच भागात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते तेथील उंच शिखरे कायम बर्फाने झाकलेली असतात.

ही भारतीय हवामानातील मोठी विषमता आहे. तसेच भारताचा अक्षवृत्तीय विस्तार, समुद्रसपाटीपासूनची उंची प्राकृतिक रचनेची विविधता दर्शवते.

भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते.

भारताचे हवामान हा हिंदी महासागर व हिमालय पर्वत प्रदेशाचा परिणाम असून हवामान दृष्ट्या भारताचे स्थान उष्णकटिबंधात आहे.

मान्सूनची निर्मिती

भारताचे हवामान उष्णप्रदेशीय मोसमी प्रकारचे आहे. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम म्हणजे ऋतु या शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजेच मान्सून वारे ऋतू निहाय दिशेत बदल होऊन वाहणारे वारे आहेत. त्यांची निर्मिती प्रामुख्याने खंड व महासागर तापणे व थंड होणे या गुणधर्मामुळे होते. विषुववृत्ताजवळील कमी दाबाचा पट्टा हा दोन्ही गोलार्धातील पूर्वी वाऱ्यांच्या संमेलनाचा भाग म्हणून ओळखला जातो. सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे हा पट्टा ऋतुमानानुसार विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सरकतो. पृथ्वीवरील बहुतांश भागात हा पट्टा सरकण्याची मर्यादा ५ अंश ते १० अंश अक्षवृत्त असते. भारतीय उपखंडात हा पट्टा या पलीकडेही सरकतो म्हणजे या पट्ट्याचे सरकणे मान्सूनच्या निर्मितीशी संबंधित आहे.

नैऋत्य मान्सून वारे-

साधारणतः मार्च महिन्यानंतर उत्तर गोलार्धात तापमान वाढण्यास सुरुवात होते. भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील हिमालय पर्वतरांगामुळे थंड वारे हिमालयाच्या दक्षिण भागात पोहोचू शकत नाही, त्यामुळे हिमालयाच्या दक्षिणेकडे व उपखंडाच्या वायव्य भागात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते व भारतीय उपखंडातील जास्त उष्णता असलेल्या भागात वायुदाब कमी हो जातो यामुळे या भागात कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.

याच काळात दक्षिणेकडील समुद्र भागावर तापमान कमी असते म्हणून या भागात वायुदाब अधिक प्रमाणात असतो त्यामुळे उपखंडातील कमी दाबाच्या भूभागाकडे सागरी भागावरून बाष्पयुक्त वारे वाहू लागतात. या काळातच पूर्वी वाऱ्यांच्या संमेलन भाग विश्ववृत्ताच्या उत्तरेकडे सरकतो. भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात कमी दाब निर्माण होतो. त्यामुळे वाऱ्यांचा संमेलन पट्टा उत्तरेकडे सरकतो. कमी दाबाचा पट्टा उत्तर गोलार्धात अधिकाधिक सरकत गेल्याने दक्षिण गोलार्धात पूर्वी वारे विषुववृत्त ओलांडतात व त्यांची दिशा बदलते होते व ते नैऋत्य कडून ईशान्य कडे वाहतात व त्या वाऱ्यांना ईशान्य मान्सून वारे म्हणतात.

ईशान्य मान्सून वारे-

हिवाळ्याच्या दिवसात कमी तापमानामुळे उत्तर भारतात जास्त वायुदाबीचे केंद्र तयार होते. याच काळात हिंदी महासागरावर तापमान जास्त असल्याने कमी वायुदाब असतो त्यामुळे उत्तरेकडील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून दक्षिणेकडे हिंदी महासागरावरून कमी वायुदाब केंद्राकडे वारे वाहू लागतात.

म्हणजेच भारतीय भूमीवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा साधारणपणे ईशान्य कडून नैऋत्येकडे असते म्हणून या वाऱ्यांना ईशान्य मान्सून वारे म्हणतात.

मान्सून निर्मितीत महत्त्वाचे घटक १)भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र. २)खंड व महासागराचे तापमान तापने व थंड होणे.३) दक्षिण गोलार्धातील पूर्वी वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होणे.४)पूर्वी वाऱ्यांचा संमेलन पट्टा उत्तरेकडे सरकणे इत्यादी कारणामुळे मान्सूनची निर्मिती होते.

भारतातील ऋतू प्रणाली:

१)उन्हाळा (मार्च ते मे)

२)पावसाळा (जून ते सप्टेंबर)

३)संक्रमण महिना (काळ)/मान्सून वाऱ्याचा परतीचा काळ (ऑक्टोबर ते नोव्हेंबर)

४)हिवाळा (डिसेंबर ते फेब्रुवारी)

१)उन्हाळा (मार्च ते मे)-

उन्हाळ्याच्या दिवसात भारतात दिनमान  कालावधी वाढल्यामुळे तापमानात वाढ होऊ लागते.

भारतीय उपखंडावर सर्वच भागात उन्हाळ्याच्या कालावधीत तापमान जास्त असते त्यामुळे अनेक ठिकाणी कमी दाब असतो. त्यामुळे वादळाची निर्मिती होते ही स्थानिक वादळे देशात वेगवेगळ्या नावाने ओळखली जातात.

धुळीची वादळे – मे जून महिन्यात लू हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहतात.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात विशेषतः राजस्थान, हरियाणा, पंजाब व उत्तर प्रदेश या राज्यात धुळीची वादळे निर्माण होतात. साधारणतः दुपारनंतर या वाऱ्याची निर्मिती होते. बाष्पाच्या अभावामुळे हे वारे अतिशय कोरडे असतात म्हणून या वाऱ्यांना “लू“असे म्हणतात.

पंजाब, हरियाणा, राजस्थान मधील धुळीच्या वादळांना “आंधी” असे म्हणतात.

एप्रिल मे महिन्याच्या सुमारास पश्चिम बंगाल, ओडिसा या राज्यात अचानक वादळे निर्माण होतात. ही वादळे वायव्य भागातून येतात म्हणून यांना “नॉर्वेस्टर” असे म्हणतात. यांच्यामुळे विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन मुसळधार पाऊस पडतो.

पश्चिम बंगालमध्ये या वाऱ्यांना “कालबैसाखी” या नावाने ओळखले जाते. मान्सूनपूर्व पर्जन्य उन्हाळ्याच्या शेवटच्या काळात केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र राज्यात मान्सून पूर्व सरी पडतात. महाराष्ट्रात या पावसाला “आम्रसरी पाऊस” असे म्हणतात.

याच काळात महाराष्ट्राच्या काही भागात पडणाऱ्या पावसाला “वळवाचा पाऊस” असे म्हणतात.

कर्नाटक, केरळ राज्यात मान्सूनपूर्वकाळात पडणाऱ्या पावसाला “कॉफी बहार सरी” असे म्हणतात.

२)पावसाळा (जून ते सप्टेंबर)

भारतामध्ये जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मानसून वाऱ्यापासून पाऊस पडतो.

नैऋत्य मान्सून वाऱ्याचे आगमन बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार बेटावर २५ मे च्या दरम्यान होते. तर १ जून रोजी केरळ राज्याच्या किनाऱ्यावर पोहोचतात.

अरबी समुद्रावरून येणारी मान्सून वाऱ्यांची शाखा ७ जूनला सिंधुदुर्ग ला पोहोचते तर १० जून पर्यंत मुंबई 15 जून पर्यंत मध्य महाराष्ट्र १ जुलै पर्यंत पंजाब हरियाणा मध्ये पोहोचते.

नैऋत्य मानसून वाऱ्याच्या दोन शाखा-

अरबी समुद्रावरून वाहणारे मान्सून वारे

बंगालच्या उपसागरावरून वाहणारे मान्सून वारे

अरबी समुद्रावरून वाहणारे मान्सून वारे-

अरबी समुद्रावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्यात बाष्पाचे प्रमाण अधिक असते. व ही वारे सह्याद्री पर्वतात अडवली जातात. त्यामुळे प्रतिरोध पर्जन्य पडतो. या वाऱ्यामुळे पश्चिम किनारपट्टी सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार व घाटमाथ्यावर भरपूर पाऊस पडतो.

घाट माथा व ओलांडून हे वारे पूर्वेकडे खाली सरकतात. त्यावेळी त्यांचे तापमान वाढल्याने बाष्प धारण करण्याची क्षमता वाढते त्यामुळे पूर्वेकडील भागात पाऊस कमी पडतो. म्हणून त्या प्रदेशात “पर्जन्यछायेचा प्रदेश” असे म्हणतात.

अरबी समुद्रावरून येणारी मान्सून वाऱ्याची शाखा सह्याद्री व पर्जन्य छायेचा प्रदेश ओलांडून पूर्वेकडे वळते यावेळी अरबी समुद्रावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्याची दुसरी शाखा गुजरात राजस्थान मार्गाने पुढे उत्तरेस कमी दाबाच्या प्रदेशापर्यंत पोहोचते.

गुजरात व राजस्थान या भागात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे, कारण या राज्यात वाऱ्यांना अडवणारे मोठे पर्वत अस्तित्वात नाहीत. मात्र राजस्थान राज्यात अरवली पर्वत आहेत परंतु त्यांची दिशा नैऋत्य ईशान्य असे असल्यामुळे नैऋत्य मान्सून वाऱ्याची दिशा एकसारखी असल्यामुळे या वाऱ्यांना पर्वत अडथळा निर्माण करू शकत नाही म्हणून राजस्थानमध्ये अत्यंत कमी पाऊस पडतो.

बंगालच्या उपसागरावरून वाहणारे मान्सून वारे-

बंगालच्या उपसागरावरून वाहणारे मान्सून वारे गंगेच्या त्रिभुज प्रदेशात आल्यानंतर या मान्सून वाऱ्याची दोन उपप्रवाह निर्माण होतात एक प्रवाह पूर्वेकडे व ईशान्यकडे वळतो ,तर दुसरा प्रवाह उत्तर वायव्यकडे वळतो. ईशान्य कडे वाहणारे वारे मेघालय पठाराच्या दक्षिणेकडील तीव्र उतारामुळे अडवले जातात व या उतारावर मुसळधार पाऊस पडतो. हा जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो.

मेघालय राज्यात चेरापुंजी व मौसिनराम या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. मात्र मेघालय पठाराच्या उत्तरेकडील भाग पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो.

मान्सून वाऱ्याची दुसरी शाखा पूर्वेकडून पश्चिमेकडे गंगेच्या खोऱ्याकडे वळते व हे वारे पश्चिमेकडे वाहताना त्याच्यातील बाष्पांचे प्रमाण कमी होते त्यामुळे पूर्वेकडे पश्चिमेकडे जाताना पावसाचे प्रमाण कमी होत जाते.

३)संक्रमण महिना/मान्सून वाऱ्याचा परतीचा काळ (ऑक्टोबर ते नोव्हेंबर)-

15 सप्टेंबर पर्यंत नैऋत्य मान्सून वाऱ्याचा जोर कायम असतो 23 सप्टेंबर नंतर दिनमान कमी झाल्यामुळे भारतीय उपखंडात हळूहळू तापमान कमी होते व वायुदाब घटू लागतो. त्यामुळे वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहू लागतात व मान्सून परतीचा काळ सुरू होतो.

१ ऑक्टोबर पर्यंत हे वारे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यातून तर १ डिसेंबर पर्यंत तामिळनाडू राज्यातून मान्सून वारे समुद्राकडे परत जातात.

ऑक्टोबर- नोव्हेंबर या महिन्यात वातावरणाची उष्ण दमट पावसाळी स्थिती हळूहळू थंड व कोरडी होत जाते त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात तापमान वाढते साधारणपणे हा मान्सून परतीचा परिणाम आहे. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या दरम्यान मान्सून परतीच्या काळात “संक्रमण काळ” किंवा “ऑक्टोबर हिट” असे म्हणतात.

याच काळात बंगालच्या उपसागरावर विशेषतः आग्नेय भागात आवर्ताची निर्मिती होते ही आवर्त अंदमान व निकोबार बेटाच्या परिसरातून पश्चिमेकडे वळतात व भारताच्या पूर्व किनारी भागात मुसळधार पाऊस देतात.

४)हिवाळा (डिसेंबर ते फेब्रुवारी)

डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात भारतात हिवाळ्याचा कालावधी असतो यावेळी उत्तर भारतात सरासरी किमान तापमान 10°c ते 50°c असते. तर दक्षिणेकडे ते वाढत जाऊन तामिळनाडू राज्यात 25°c इतके तापमान असते. हिवाळ्याच्या दिवसात ईशान्य मान्सून वारे वाहतात. ही वारे बहुतांशी जमिनीवरून वाहत असल्याने ते थंड व कोरडे असतात. मात्र बंगालच्या उपसागरावरून वाहताना ते बाष्पाचे प्रमाण धारण करतात. त्यामुळे आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो.

हिवाळ्यात मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाचा भारतीय द्वीपकल्पातील हा एकमेव प्रदेश आहे.

हिवाळ्यात पाऊस होणारा दुसरा भाग म्हणजे जम्मू-काश्मीर होय. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळीवृष्टी ही उच्च स्तरावरून वाहणाऱ्या जेट प्रवाहाचा परिणाम आहे. ही वारे अतिउंचावरून वाहतात व जम्मू-काश्मीर भागात आल्यानंतर खाली उतरतात त्यामुळे तेथे पाऊस पडतो.

साधारणपणे देशाच्या बहुतांशी भागात डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात आकाश निरभ्र असते.

भारतातील सरासरी पर्जन्य वितरण:

भारतातील सरासरी पर्जन्याचे वितरण स्थळ काळानुसार असमान आहे. भारतातील एकूण पावसाच्या 80 टक्के नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस होतो.

मेघालय राज्यात मौसीनराम येथे सर्वाधिक पाऊस पडतो. तर राजस्थानच्या वाळवंटात अत्यंत कमी पाऊस पडतो.

साधारणपणे जून ते सप्टेंबर या महिन्यात देशाच्या सर्वच भागात कमी अधिक पाऊस पडतो.

सरासरी पर्जन्य वितरणाचे पाच विभाग पडतात.

१.सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश

भारताच्या ईशान्य भागात दोन्ही मान्सून वाऱ्याच्या शाखा एकत्र आल्यामुळे पावसाचे प्रमाण वाढलेले असते.

प्रदेश -दक्षिण सह्याद्री, मेघालय राज्य, अरुणाचल प्रदेशचा काही भाग यांचा समावेश होतो.

२.जास्त पर्जन्याचा प्रदेश

या भागात पूर्व आसाम, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, उत्तर अरुणाचल प्रदेश व सह्याद्रीच्या पश्चिम उताराचा प्रदेश यांचा समावेश होतो.

या प्रदेशाचा विस्तार कमी आहे. सह्याद्री पर्वत पैशान्यकडील पर्वतीय प्रदेशात पर्जन्य अधिक पडते.

३.मध्यम पर्जन्याचा प्रदेश

यात पश्चिम हिमालयाच्या शिवालिक टेकड्या, हिमाचल रांगा, उत्तराखंड, गंगेच्या मैदानाचा पूर्व भाग, ईशान्य पठारी प्रदेश तसेच मैकल टेकड्या, महादेव डोंगररांग, विंध्य पर्वताचा पूर्व भाग यांचा समावेश होतो.

४)कमी पर्जन्याचा प्रदेश

दख्खनच्या पठाराचा पर्जन्यछायेचा भाग, राजस्थान, गुजरातचा काही भाग, जम्मू-काश्मीरचा उत्तर भाग, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्याचा काही भाग यांचा समावेश होतो.

५)अति कमी पर्जन्याचा प्रदेश

जम्मू-काश्मीर राज्याच्या उत्तरेकडील भाग, पंजाबचा नैऋत्य भाग, राजस्थानचा पश्चिम भाग व गुजरात मधील कच्छचे रण यांचा समावेश होतो.

Leave a comment